Potato Sliced Bhaji in marathi-:

सोप्पी, झटपट खमंग बटाट्याच्या काचऱ्याची भाजी -:



#potato sliced recipe in marathi

# potato sliced bhaji in marathi

बटाट्याच्या काचऱ्याची भाजी ही लहानपणा पासूनच्या आठवणीतील सर्वाना माहिती असणारी महाराष्ट्रातील फेमस भाजी आहे.

बालपणी आईच्या हातच्या बटाट्याच्या काचऱ्याची कुरकुरीत खमंग भाजी, आंबट गोड वरण भात, तूप, कैरीचं,लिंबाचे लोणचं,पिठले माझ्या फूडलिस्टमधील हे आवडीचे पदार्थ असायचे. माझ्या फूडलिस्ट मध्ये कैरीचं लोणचं आणि बटाट्याच्या काचऱ्याची भाजी म्हणजे एकदम वरचा क्लास.

बटाट्याची परतून भाजी  पटकन होणारी,बटाटयाच्या काचऱ्या ही अगदी सोपी पाककृती आहे.कुणी याला नुसती बटाट्याची भाजी म्हणतात, कुणी बटाट्याचे काप, बटाटयाच्या काचऱ्या म्हणतात. वेळ कमी असताना, गडबडीत पटकन करून पोळीबरोबर डब्यात न्यायला येते. ही भाजी पोळी, पुरी किंवा डोशाबरोबर छान लागते.

बटाट्याच्या काचऱ्याच्या भाजीतील खरपूस कांदा, लसूण, मोहरीचे दाताखाली येणारे दाणे आणि कुरकुरीत खमंग बटाट्याचे काप ही मन तृप्त करणारी आणि कुठल्याच हॉटेल मध्ये न मिळणारी भाजी आहे. नुसत्या काचऱ्या नाहीत तर त्या सोबत ताज्या गरम गरम चपातीचा  वास अहा.... 

चला तर आज करूयात बालपणातील आठवण आईची रेसिपी सोप्पी, झटपट होणारी खमंग बटाट्याच्या काचऱ्याची भाजी /Potato Sliced Bhaji 

साहित्य :

४ बटाटे

१ कांदा मिडियम बारीक चिरलेला

१० लसूण पाकळ्या तुकडे कापलेले

१ टीस्पून चमचा लाल तिखट

१टीस्पून हळद  

१/२ टीस्पून मीठ

१ टेबलस्पून तेल

१/४ टीस्पून मोहरी

१/४ टीस्पून जिरे

१/४ टीस्पून हिंग

१ टेबलस्पून बारीक चिरलेला  कोथिंबीर

कृती :

स्टेप१ : बटाटे  एका भांड्यात पाण्यात बुडवून ठेवून स्वच्छ धुऊन घ्या.बटाटे छान साफ करून घ्या,आपण भाजी सालासकट करणार आहोत.सालीत असलेली जीवनसत्त्वेही वाया जाणार नाहीत. प्रत्येक बटाट्याचे २ भाग करा.पातळ काप चिरून घ्या. एका भांड्यात पाणी घ्या. त्या पाण्यात बटाट्याचे काप बुडवून ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत.

स्टेप२ : जाड बुडाच्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी व जिरे घाला.दोन्ही तडतडल्यावर हिंग व  घालून परता. त्यात कांदा ,लसूण घालून परतून घ्या. कांदा लसूण लालसर होईपर्यंत परतावे.त्या नंतर हळद, तिखट टाकून मिसळून घ्या. नंतर त्यात चिरलेले बटाटे घालून फोडणीत नीट मिसळून घ्या. 






स्टेप३ : कढईवर झाकण ठेऊन२-३ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.झाकण काढून मीठ घालून सर्व नीट मिसळा व परत झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवा.

चमच्याने टोचून बटाटे  शिजले आहेत की नाही ते पहा. शिजले नसल्यास एकदा चमच्याने नीट मिसळून आणखी २ मिनिटे शिजू द्या. बटाटे तुम्हाला हवे तितके शिजल्यावर गॅस बंद करा.भाजी शिजवताना पाणी घालू नये. तेलावरच शिजवावी. 



स्टेप४: वाढतेवेळी चिरलेली कोथिंबीर घालावी. बटाट्याच्या काचऱ्याची भाजी घडीची पोळी/चपाती बरोबर किंवा पुरी, दोसे याबरोबर गरम गरम सर्व करा.




Post a Comment

0 Comments