विदर्भ वऱ्हाडी स्टाईल झणझणीत, भन्नाट ,कच्चा, खल बत्यातील हिरव्या मिरचीचा खर्डा (ठेचा):
काहीतरी तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाली तर महाराष्ट्रीयन ठेच्याला पर्याय नाही. कमीत कमी पदार्थांमध्ये काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा आपला मराठमोळा पदार्थ प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक विदर्भ वऱ्हाडी स्टाईल झणझणीत,कच्चा ,खल बत्यातील हिरव्या मिरचीचा खर्डा (ठेचा) रेसिपी. विदर्भातील ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरच्यांचा ठेचा पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटते. मला खात्री आहे की हा झणझणीत खर्डा ( ठेचा) सर्वाना आवडेल.
साहित्य :
हिरव्या मिरच्या ६ ते ७
लसूण पाकळ्या ५
मीठ चवीनुसार
१ टेबलस्पून कोथिंबीर
चिमूटभर जिरे
कृती :
स्टेप १ - प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवा आणि कापडाला पुसून घ्या.मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या.
स्टेप २ - आता मिरच्या ,लसूण जिरे मीठ कोथिंबीर हे सर्व घटक एकत्र करून दगडी खलबत्त्यात बत्त्याच्या साहाय्याने ठेचून घ्या . खलबत्त्यात कूटल्यामुळे ठेच्याला वेगळीच चव येते. खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यात सर्व घटक एकदा फिरवून घ्या. हा ठेचा जाडसर असतो त्यामुळे बारीक करू नये.
स्टेप ३ - आता हे जाडसर असलेले मिश्रण एका वाटीत काढून घ्या. आणि भाकरी, पोळी, किंवा वरण भाताला तोंडी लावण्याकरिता भन्नाट ठेचा तयार आहे आणि ह्या तिखट खरड्यावर जवसाचे तेल किंवा घरी जे available तेल असेल ते मिसळुन खावे.





0 Comments