Mixed sprouts usal recipe 

पौष्टिक ब्रेकफास्ट (न्याहारी) मिश्र कडधान्याची मोड काढलेली बिना तिखटाची चमचमीत उसळ :


# mixed sprouts usal

# easy and quick mixed sprouts usal recipe

मोड काढलेले कडधान्य म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. तर चला आज आपण करूयात पौष्टिक न्याहारी मिश्र कडधान्याची मोड काढलेली बिना तिखटाची चमचमीत उसळ.

साहित्य :

१ १/२  टेबलस्पून मूग

१ १/२  टेबलस्पून मटकी

१ १/२  टेबलस्पून चणे

तुमच्या आवडीनुसार आणि घरात अव्हेलेबल असलेले कोणतेही कडधान्य वापरू शकता.

फोडणीसाठी: 

3 टीस्पून तेल, 

२ चिमटी मोहोरी,  

1/2 टीस्पून हिंग,

१/४ टीस्पून हळद,  

४-५ कढीपत्ता पाने

२- ३ मोठ्या लसणीच्या पाकळ्या बारीक कापून

१ बारीक चिरलेला कांदा

१ बारीक चिरलेला टोमॅटो

१ टेबलस्पून बारीक चिरलेला कोथिंबीर

चवीपुरते मीठ

कृती:

स्टेप १: कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. पाण्याची पातळी साधारण कडधान्याच्या वरती पाणी टाका.कडधान्ये नीट भिजली कि त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत.स्वच्छ केलेली कडधान्ये सूती कापडात घट्ट बांधून बांधून चाळणीत ठेवावी. चाळणी एका स्टँडवर ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.मिक्स कडधान्याला  मोड आले कि उसळ बनवायच्या आधी पाण्यात घालून लगेच उपसावेत. यामुळे कडधान्य थोडे ओलसर होतात त्यामुळे कुकरमध्ये वाफवायला सोपे जाते. 



स्टेप २: नंतर कुकर घ्या त्यात जाळी आणि पाणी घाला त्या कुकरच्या जाळीवर कुकरच्या भांड्यात मोड आलेले कडधान्य टाका भांड्यात पाणी घालू नका. कुकरचे झाकण शिटी लावून बंद करून वाफवून घ्या. दोन शिट्या झाल्या की कुकर थंड होऊ द्या.


स्टेप ३: त्यानंतर कढईत तेल गरम करून. मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि कांदा नीट परतून घ्यावा.कांदा छान परतला कि टोमॅटो घालून परतावे. नंतर मिक्स वाफवलेले कडधान्य घालून परतावे. मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. मूग कोरडे पडू देवू नये. यासाठी मध्येमध्ये पाण्याचा हबका मारावा.थोडा रस ठेवायचा असल्यास गरजेपुरते पाणी घालावे.उकळी काढावी आधी वाफाविली असल्याने जास्त शिजवू नका. 





स्टेप ४
: तयार आहे सकाळच्या ब्रेकफास्ट साठी (न्याहारी) मिश्र कडधान्याची मोड काढलेली बिना तिखटाची चमचमीत उसळ .कोथिंबीर घालून सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments